भूसुरुंग स्फोटानंतर नक्षलवाद्यांची बॅनरबाजी !

Foto

गडचिरोली : महाराष्ट्र दिनी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा गावाजवळ बुधवारी नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात 15 जवान शहीद झाल्यानंतर आज राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल आणि अन्य वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळाची पाहणी केली. गुरुवारी सकाळपासून पोलिसांनी नक्षली हल्‍ला झालेल्या भागात शोधमोहीम सुरू केली आहे. दुसरीकडे या भ्याड हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी बॅनरबाजी करत सरकारला धमकी दिली आहे. गडचिरोलीमध्ये पूल आणि रस्ते बांधू नका, असे बॅनर उत्तर गडचिरोली परिसरात नक्षलवाद्यांकडून लावण्यात आले आहेत. 

नक्षलवाद्यांनी मंगळवारी मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावरील कंत्राटदाराच्या 36 वाहनांची जाळपोळ केली होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर कुरखेडाचे उपविभागीय पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या जाळपोळीनंतर बुधवारी सकाळी 11 वाजता बंदोबस्तासाठी कुरखेडा येथून शीघ्र कृती दल अर्थात क्‍विक रिस्पॉन्स टीमचे (सी 60) जवान टाटा एस या मालवाहू वाहनाने जात असताना नक्षलवाद्यांनी त्यांना लक्ष्य केले. नक्षलवाद्यांनी जांभुरखेडा गावाजवळ घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात क्यूआरटी चे 15 जवान शहीद झाले. या शहीद जवानांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील 6, भंडारा जिल्ह्यातील 3, बुलडाणा जिल्ह्यातील 2 तसेच हिंगोली, बीड, नागपूर, यवतमाळ येथील प्रत्येकी एका जवानाचा समावेश आहे. गेल्या वर्षी कसनासूर-बोरीयाच्या जंगलात पोलिसांनी 40 नक्षलवाद्यांना ठार केल्याचा बदला घेण्यासाठी नक्षलवाद्यांनी हा हल्‍ला केल्याचे बोलले जाते. नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत 2009 मध्ये तीन वेळा भूसुरुंग स्फोट केले होते. या तीन घटनांनंतर नक्षलवाद्यांना अशा प्रकारची मोठी कारवाई करता आली नव्हती. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, पोलिस महानिरीक्षक, गडचिरोलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी, नक्षलविरोधी मोहीमेतील अधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली.